मुख्‍यमंत्र्यांची नाटके ऑक्‍टोबरपर्यंतच… – प्रकाश आंबेडकर

0
10

पंढरपूर | ‘मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय नाटके करायची आहेत ती करू द्यात. ते पुढच्या ऑक्टोबरपर्यंतच मुख्यमंत्रिपदावर राहणार आहेत’, अशी घणाघाती टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना मिरज दंगलीच्या आरोपातून मुक्त केल्याच्‍या संदर्भात त्‍यांनी मुख्‍यमंत्र्यांवर निशाणा साधला. ते पंढरपूर येथे बोलत होते. ‘भिडे यांच्‍यावरील आरोप गंभीर आहेत. त्यांना दोषमुक्त करण्याचा आधिकार मुख्यमंत्र्याना नाही. आता त्यांना काय नाटके करायचीत ती करू द्या. पुढच्या वेळी आमचीच सत्ता येणार आहे. पुन्हा भिडेंना आत घालू,’ असे आंबेडकर म्हणाले.

काँग्रेस पक्षामधील नेते धर्मनिरपेक्ष असल्याने काँग्रेससाठी चर्चेचे दरवाजे खुले आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा प्रश्नच नाही, असेदेखील त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा आता मठ-मंदिराना भेटी देणं सुरू केले आहे. त्यामुळं ते सुद्धा फारसे वेगळे नाहीत, असे म्‍हणत त्‍यांनी काँग्रेसवरही टीका केली. ‘काँग्रेस नेत्यांचे सतत फोन येत आहेत. मात्र, आम्ही काँग्रेसवर अवलंबून नाही’, असे म्‍हणत त्‍यांनी वंचित बहुजन आघाडीकडे 37 लोकसभा मतदारसंघात उमेदवार तयार आहेत, अशी माहिती दिली.