माथेरानमध्ये पर्यटकांना उल्कापात पाहण्याची संधी

0
69

या उल्‍कापाताकडे जगभरातील वैज्ञानिकांचेही लक्ष आहे.

रायगड (माथेरान) | दिपक पाटील

महाराष्‍ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्‍या माथेरानमध्‍ये उल्‍कापात पाहण्‍याची अपूर्व संधी पर्यटकांना मिळणार आहे. येथील आकाशगंगा नावाच्‍या आकाश निरीक्षण केंद्रामध्ये 18 नोव्हेंबर रोजी पर्यटकांना ही सुविधा उपलब्‍ध करून दिली जाणार आहे. ही संधी म्हणजे खगोल अभ्यासकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. 18 नोव्हेंबर रोजी रात्री एक वाजल्यानंतर पहाटेपर्यंत उल्कापात पाहण्याची संधी मिळणार आहे. या उल्‍कापाताकडे जगभरातील वैज्ञानिकांचेही लक्ष आहे.

उल्कापात पाहण्यासाठी माथेरानच का ?
कोणत्याही शहरात गेलो तर प्रदूषण हमखास पहायला मिळते. मुंबई मधून अवकाशाकडे पाहिले असता धूलिकण दिसून येतात त्यामुळे तारे सुद्धा स्पष्ट दिसत नाहीत. मात्र माथेरान हे प्रदूषण मुक्त व सर्वत्र गर्द झाडी असल्याने अवकाश निरभ्र दिसते. त्यामुळे येथील आकाशगंगा निरीक्षण केंद्रातून तारे, ग्रह स्पष्ट दिसतात.

उल्‍कापात पाहण्‍यासाठी विशेष व्‍यवस्‍था
आकाशगंगा निरीक्षण केंद्रातून आम्ही उल्कापात दाखविण्याचा प्रयत्न करणार आहोत. शनिवारी 17 आणि रविवार 18 च्या रात्री हे पाहण्याची संधी मिळणार आहे. या केंद्रावर उल्कापात पाहण्यासाठी आम्ही दुर्बिणीची व्यवस्था केली आहे. पर्यटकाना व खगोल अभ्यासकांना हि एक महत्‍त्वपूर्ण पर्वणी आहे.
– शैलेश संसारे, संचालक आकाशगंगा प्रकल्प

असा प्रकल्‍प उभारणारी माथेरान पहिली नगरपालिका
महाराष्ट्रातील नगरपालिकांमध्ये माथेरान पहिली नगरपालिका आहे जिने फिरण्याबरोबर विज्ञान विषयक आकाशगंगा प्रकल्प उभारला आहे. आता उल्कापात पाहण्याची पर्यटकांना खास पर्वणी असणार आहे. यासाठी आम्ही जोमाने काम सुरू केले आहे. ही उल्कापात पाहण्यासाठी जास्तीतजास्त पर्यटकांनी माथेरानमध्ये उपस्थिती दाखवावी, असे आवाहन माथेरान गीरीस्थानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी केले आहे.

उल्का म्हणजे काय ?
आकाशातील धूमकेतू मधून निघालेला एखादा घटक पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत आल्यावर तो पृथ्वीच्या वातावरणात फिरत रहातो. वातावरणात घर्षण होऊन तो घटक फिरताफिरता पेट घेऊन समूळ नष्ट होतो. त्यास उल्का म्हणतात. मात्र काही घटक वातावरणात पेट घेतात पण पूर्ण न जळता धातू राहून तो जमिनीवर पडतो त्यास अशमी म्हणतात.