‘No Mandir, No Vote’, पुणे न्यायालयाच्या भिंतीवर पोस्टर्स; पंतप्रधान मोदींना इशारा

0
11

पुणे | राम मंदिराच्‍या मुद्द्यावरून देशभरातील वातावरण तापत असतानाच पुणे न्‍यायालयाच्‍या भिंतीवर राम मंदिराची मागणी करणारी पोस्‍टर्स लावलेली आढळून आली आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. मात्र ही पोस्‍टर्स कोणी लावली, हे अद्याप समजू शकलेले नाही.

या पोस्‍टर्सवर पंतप्रधान मोदींना उद्देशून ‘राम मंदिर नाही, तर मत नाही’, असा इशारा देण्‍यात आला आहे. तसेच 2019 पूर्वी संसदेत कायदा करून राम मंदिराची निर्मिती करावी, असे आवाहनही करण्‍यात आले आहे. #NoMandirNoVote असा हॅशटॅग वापरून ही पोस्‍टर्स न्‍यायालयाच्‍या भिंतीवर लावण्‍यात आली आहेत.

सुप्रीम कोर्टाने हा मुद्दा आपल्‍या प्राथमिकतेत नाही असे म्‍हणत या प्रकरणाची सुनावणी जानेवारी 2019 पर्यंत पुढे ढकलली आहे. यामुळे देशभरातील हिंदुत्‍ववादी संघटना आक्रमक झाल्‍या आहेत. नुकतेच दिल्‍लीमध्‍ये ‘अखिल भारतीय संत समिती’ या नावाखाली देशभरातील हिंदु संतांची दोन दिवसीय परिषद झाली. यामध्‍ये संतांनी आक्रमकपणे लवकरात लवकर राम मंदिर उभारण्‍याची विनंती मोदी सरकारला केली आहे. तसेच अयोध्येत योगी आदित्यनाथ राम मंदिर किंवा रामाचा पुतळा याबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. अशा वातावरणात या पोस्टर्सनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.