मुलीच्या लग्नाला पैसे नाही म्हणून पित्याने केली आत्महत्या

0
10

त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न 18 नोव्हेंबर रोजी होणार होते.

औरंगाबाद | मुलीच्या लग्नाला पैसे नाही म्हणून पित्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना औरंगाबाद येथील नारेगाव परिसरात घडली. नागेश काशिनाथ आठवले(वय 40) असे मृत पित्याचे नाव असून बुधवारी रात्री घरात कोणी नसल्याचे पाहून त्यांनी आत्महत्या केली.

प्रत्येक पित्याचे आपल्या मुलीचे लग्न धुमधडाक्यात करण्याचे स्वप्न असते. नागेश याचंदेखील हेच स्वप्न होतं. नागेश हे मोलमजुरी करून घराचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न 18 नोव्हेंबर रोजी होणार होते. त्यासाठी घरामधील सर्व सदस्य तयारीला लागले होते. पण मुलीचे लग्न पाच दिवसांवर येऊनही पैशांची अडचण काही दूर होईना. त्यामुळे नागेश हे गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. याच चिंतेत त्यांनी बुधवार रात्री घरी कोणाही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार जेव्हा कुटुंबीना लक्षात आला त्यावेळी कुटुंबीयांनी पोलिसांना घटनेबद्दल माहिती दिली. त्यांनतर नागेश यांना घाटी रूग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आर्थिक अडचणींमुळे नागेश यांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता त्यांच्या नातेवाईकांनी वर्तविली आहे.