… तर पाकिस्‍तानला धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र बनावे लागेल: लष्‍करप्रमुख बिपिन रावत

0
10

पुणे | भारत आणि पाकिस्‍तानला एकत्र यायचे असेल तर त्‍यापूर्वी पाकिस्‍तानला धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र बनावे लागेल, असे लष्‍करप्रमुख बिपिन राऊत यांनी म्‍हटले आहे. फ्रान्‍स आणि जर्मनी एकत्र येऊ शकतात तर भारत आणि पाकिस्‍तान का नाही, असे वक्‍तव्‍य पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी केले होते. त्‍यावर बिपिन रावत यांनी ही प्रतिक्रिया दिली.

पुण्‍यात शुक्रवारी सकाळी राष्‍ट्रीय अकादमी दलाच्‍या कार्यक्रमाला त्‍यांनी हजेरी लावली होती. त्‍यानंतर पत्रकारांशी चर्चा करताना त्‍यांनी ही प्रतिक्रिया दिली.

यावेळी बिपिन राऊत म्‍हणाले, ‘पाकने प्रथम स्‍वत:ची अंतर्गत स्थिती पाहावी. त्‍यांनी स्‍वत:ला इस्‍लामिक राष्‍ट्र बनवले आहे. भारताशी संबंध सुधारायचे असेल तर पाकला प्रथम धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र व्‍हावे लागेल.’ पाकिस्तान एक इस्‍लामिक राष्‍ट्र आहे, ज्‍यात इतर कुणालाही स्‍थान नाही. असे असताना भारत-पाक एकत्र कसे काय येऊ शकतात? असा सवाल यावेळी बिपिन रावत यांनी केला.

तसेच भारताने एक पाऊल पुढे टाकले तर पाकिस्‍तान दोन पाऊले टाकेल, या इम्रान खान यांच्‍या वक्‍तव्‍यावर बिपिन रावत म्‍हणाले, ‘अनेकदा भारतानेच पहिले पाऊल उचलले आहे. संबंध सुधारण्‍यासाठी पाकिस्‍तानने प्रथम पुढाकार घेतला, असे एकतरी उदाहरण दाखवा. पाकिस्‍तानात दहशतवाद वाढत आहे. किमान याविरोधात तरी काही केल्‍याचे पाकिस्‍तानने दाखवून द्यावे.’

यावेळी बिपिन रावत यांनी लष्‍करातील महिलांच्‍या वाढत्‍या भुमिकेबद्दलही मत व्‍यक्‍त केले. ते म्‍हणाले, ‘आगामी काळात लष्‍कारात महिलांना अनेक महत्‍त्‍वाच्‍या भुमिका पार पाडाव्‍या लागणार आहेत. माहिती युद्ध, मानसिक युद्ध आणि लष्करी कूटनीतिमधील दुभाषी तज्ञ या क्षेत्रांत महिलांना मोठा वाव असल्‍याचे ते म्‍हणाले.

आम्‍हाला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत. अनेक युद्धानंतरही फ्रान्‍स आणि जर्मनी हे राष्‍ट्रे एकत्र येऊ शकतात आणि शांतता प्रस्‍थापित करू शकतात तर भारत आणि पाकिस्‍तान का एकत्र येऊ शकणार नाहीत, असे इम्रान खान कर्तारपूर या मार्गिकेचे उद्घाटन करताना म्‍हणाले होते.