शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे आता शरयू नदीत पडले – देवेंद्र फडणवीस

0
13

 

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे नुकताच सहकुटूंब अयोध्या दौरा करून आले. त्याचे पडसाद आता हिवाळी अधिवेशनातही उमटत आहेत.  भाजप आणि शिवसेनेनं येणारी लोकसभा निवडणूक एकत्र लढायला हवी, याचा पुनरुच्चार करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शिवसेनेवर निशाणा साधलाय. शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे आता शरयू नदीत पडलेत, अशी टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केलीय.

नाणार प्रकल्पावरून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी शिवसेनेला धारेवर धरले. शिवसेनेच्या मदतीला स्वत: मुख्यमंत्री धावून आले. नाणारविषयी शिवसेना मौन का पाळत आहे. त्यांचे राजीनामे खिशातुन बाहेर केव्हा निघणार, असे प्रश्न विचारत विखे पाटलांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री म्हणाले शिवसेनेचे राजीनामे आता शरयू नदीत पडलेत. तुम्ही त्याची चिंता करू नका. आम्ही दोघं (शिवसेना आणि भाजप) एकत्र आहोत आणि कोणत्याही राजीनाम्याची आता गरज नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

जेव्हा आम्ही एकत्र आहोत तेव्हा सत्तेत परतण्याची कोणतीही संधी तुमच्याकडे नाही. तुम्हाला १०-१५ वर्षांसाठी विरोधी पक्षाच्याच बाकांवर बसावं लागणार आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी एकाच वेळी दोन निशाणे साधलेत.

यामुळे येणाऱ्या काळात भाजप – शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे. कदाचीत युती झाल्यास काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे युती होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.