भाऊबीजेला घरी येतो असे म्हणाला, पण… पार्थिवच घरी आले

0
11

पुणे | शिवाजीनगर गावठाण भागात राहणारे व सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले प्रसाद बेंद्रे यांना मणिपूर येथे हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ते 27 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर रविवारी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. ते ड्यूटीवरुन परतल्यावर नेहमी कुटुंबीयांना फोन करायचे, दिवाळीच्या अगोदरही त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला होता, आणि भाऊबीजेला घरी यतो असे म्हणाले होते. पण बेंद्रे कुटुंबीयांच्या आनंदावर पाणी फेरले गेले.

प्रसाद यांच्या आई रेखा बेंद्रे यांना आपल्या भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी सांगितले की, प्रसाद 12वी नंतर बीएसएफमध्ये भरती झाला. त्याला चार बहिणी आहेत. त्यामध्ये तो सर्वात लहान अन् सर्वांचा लाडका होता. मी आसपासच्या घरात धुणी भांडीची कामे करून पाच मुलांना मोठ केले. माझे पती नेहमी आजारी असायचे. त्यामुळे घरातील सर्वांना सांभाळणे कठीण होते. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने प्रसादने घराची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली. याच दरम्यान तो सैन्य दलात भरती झाला. प्रसाद सैन्यात भरती झाल्याचा खूप आनंद झाला होता. तो कामावर असताना अनेक वेळा आमचे फोनवर बोलण व्हायचे. त्याच्या निधनापूर्वी काही दिवस अगोदर बोलणे झाले होते.

प्रसाद यांच्या पत्नी सायली या गर्भवती असून त्या म्हणाल्या, प्रसाद हे घरातील प्रत्येकाशी नेहमी फोन वर बोलायचे. प्रत्येकाची विचारपूस करायचे. दिवाळीचा सण असल्याने केव्हा येणार असे त्यांना विचारले होते. त्यावर प्रसाद यांनी भाऊबीजेला घरी येतो असे सांगितल्याचे सायली यांनी नमूद केले. आमचं फोनवर बोलणं झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या निधनाची माहिती समजली. त्यामुळे बेंद्रे कुटुंबावर जणू दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.