सावधान.! विना परवाना व्यवसाय केल्यास 1 महिन्याचा कारावास व 25 हजारांचा दंड

0
103

अन्न व औषध प्रशासन रायगड यांचा इशारा!

पनवेल | साहिल रेळेकर
नोंदणी न करता तसेच विना परवाना अन्‍न पदार्थ व्‍यवसाय करणा-यांविरोधात रायगड अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारला आहे. याप्रकरणी उरण येथील मे. बालाजी स्वीट्स या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. विनापरवाना व्‍यवसाय करणा-या बालाजी स्वीट्सच्‍या मालकाला मुख्य न्यायदंडाधिकारी (अलिबाग) यांनी 1 महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा व 25000 रूपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच त्वरित दंड न भरल्यास अजुन 1 महिन्याच्या कारावासाची शिक्षा देखील सुनावली आहे.

अन्‍न प्रशासन विभागाने उरण येथील मे. बालाजी स्वीट्स यांच्‍या दुकानाची 5 नोव्हेंबर 2015 रोजी तपासणी केली होती. तेव्‍हा विनापरवाना हा व्‍यवसाय चालू असल्‍याचे तपासात आढळून आले. तसेच दुकानातील मोतीचूर लाडू या अन्न पदार्थातील खाद्यरंगाचे प्रमाण हे प्रमाणापेक्षा जास्‍त आढळून आले होते. त्‍यामुळे दुकान मालकावर 26 एप्रिल 2016 रोजी अलिबाग न्‍यायालयात गुन्‍हा दाखल करण्यात आला होता. या खटल्‍याचा निकाल 2 नोव्हेंबर 2018 रोजी लागला व मालकाला शिक्षा सुनावण्‍यात आली.

या निकालानंतर अन्‍न व औषध प्रशासनाने सर्व अन्न पदार्थ व्यावसायिकांना परवाना घेऊन व नोंदणी करूनच व्‍यवसाय करण्‍याचे आवाहन केले आहे. अन्‍यथा त्‍यांच्‍यावर कठोर कारवाईचा ईशारा प्रशासनाने दिला आहे. अधिक माहिती करीता प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक 1800222365 अथवा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 02143-252085 वर संपर्क साधण्‍याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. तसेच परवान्‍यासाठी www.foodlicensing.fssai.gov.in या संकेतस्‍थळावर व नोंदणीसाठी www.gras.mahakosh.gov.in या संकेतस्‍थळावर अर्ज करण्‍याचे आवाहनही रायगड, अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.