शबरीमला : महिलांनो परत जा, अन्यथा मंदिर बंद करू

0
8

शबरीमला मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांचा इशारा

केरळ । शबरीमला देवस्थानाच्या दर्शनासाठी आलेल्या १०-५० वयोगटातील महिलांनी आताच परत जावे अन्यथा आम्ही मंदिराची दारं बंद करू असा इशारा मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी दिला आहे. दरम्यान मंदिराच्या प्रवेशापर्यंत पोहोचलेल्या दोन महिलांनाही मंदिर समितीने परत पाठवले आहे.

शबरीमलाच्या अय्यपा स्वामींच्या मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेशाची परवानगी नव्हती. अय्यपा स्वामी ब्रह्मचारी असल्याच्या मान्यतेमुळे या महिलांना परवानगी नाकारली जात होती. पण काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महिलांना कोणीच मंदिरात जाण्यापासून रोखू शकत नाही असा निकाल दिला. त्यानंतर यात्रा सुरू होताच अनेक महिलांनी मंदिरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. पण मंदिर समितीने कोणालाच पुढे येऊ दिलेले नाही. आतापर्यंत तीन पत्रकार महिलांनी मंदिरात जाण्याचा धाडसी पण अयशस्वी प्रयत्न केला. याबद्दल पुजाऱ्याला विचारले असता ते म्हणाले,’ शबरीमलाचे मंदिर हे काही स्त्रीस्वातंत्र्याचे मुद्दे सिद्ध करण्याची जागा नाही. मंदिरात येण्याआधी ४१ दिवस कडक उपास आणि अनेक पथ्य पाळावी लागतात. महिला त्या पाळू शकत नाहीत त्यामुळे त्यांनी आताच परत जावं अन्यथा आम्ही मंदिरांची दारं बंद करू’ .
कोर्टाने त्यांचे कायदे सांभाळावे ,आमचे नाही

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल मंदिराच्या एका पुजाऱ्यांना विचारले असता त्यांनी ,’कोर्टाला त्यांचे कायदे नीट सांभाळता येत नाही . त्यांनी देवाच्या कायद्यात ढवळाढवळ करू नये. आधी त्यांनी त्यांचे कायदे सांभाळावे. आमचा धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत’ अशी चपराक लगावली आहे. तसंच धर्मातील मागासलेपण दूर करण्यासाठी बाकीही अनेक मार्ग आहेत असंही या पुजाऱ्यांनी सुचवलं आहे.

हे सारं धर्म रक्षणासाठी…

‘ आम्ही हे सगळं आमच्या धर्माच्या रक्षणासाठी करतो आहे. हिंदू धर्म जगातला सर्वोत्कृष्ट धर्म आहे. त्या धर्माच्या मंदिरांचं आणि परंपरांचं जतन करण्याची आज वेळ आली आहे. त्यामुळेच आम्ही जे काही करतोय ते धर्म रक्षणासाठी करतोय’ असं मतही या पुजाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.