# मी टू वादळ : सहा महिला पत्रकारांचा मंत्री एम.जे.अकबरवर लैंगिक छळाचा आरोप

0
9

#MeToo मोहिमेमुळे केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांच्यासमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. आणखी सहा महिला पत्रकारांनी पुढे येऊन एम.जे.अकबर यांच्यावर लैंगिक छळ आणि असभ्य वर्तनाचे आरोप केले आहेत. एम.जे.अकबर वृत्तपत्राचे संपादक असताना त्यांनी आपल्याला त्रास दिला होता असे या महिलांनी म्हटले आहे. व्यापारी शिष्टमंडळासोबत अकबर सध्या नायजेरिया दौऱ्यावर आहेत. या आरोपांवर एम.जे. अकबर यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण त्यांनी ई-मेल, फोन कॉल्स आणि व्हॉटस अॅप संदेश कशालाही प्रतिसाद दिला नाही. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.
#MeToo मोहिमेतंर्गत आरोप झालेले ते पहिले राजकारणी आहेत. महत्वाचं म्हणजे ते मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत. बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर अश्लिल वर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर भारतात सोशल मीडियावर #MeToo मोहिम सुरू झाली आहे. या मोहिमेमुळे प्रसारमाध्यम, चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक नामांकित चेहरे अडचणीत आले आहेत.

प्रिया रमानी या महिला पत्रकाराने सर्वात आधी एम.जे.अकबर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला. ऑक्टोंबर २०१७ मध्ये वोग इंडियामध्ये लिहिलेल्या एका लेखामध्ये त्यांनी एम.जे.अकबर यांच्यासोबतच्या भेटीचा अनुभव सांगितला. त्यावेळी मी २३ वर्षांची तर अकबर ४३ वर्षांचे होते. दक्षिण मुंबईतील एक पॉश हॉटेलमध्ये अकबर यांनी मुलाखतीसाठी बोलावले होते. ती नोकरीसाठी मुलाखत कमी आणि डेट जास्त होती. त्यावेळी एम.जे. अकबर यांनी आपल्याला दारु पिण्याची ऑफर दिली त्यावेळी ते जुनी हिंदी गाणी गुणगुणत होते. त्यांनी मला बेडवर बसण्यास सांगितले पण मी नकार दिला. रमानी यांनी सोमवारी यासंबंधी टि्वट करुन एम.जे. अकबर यांचे नाव घेतले. माझ्यासारखा अनुभव अनेक महिलांना आला असेल कदाचित त्या सुद्धा पुढे येतील असे रमानी यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.
मुक्त पत्रकार कनिका गहलोत यांना सुद्धा एम.जे.अकबर यांनी हॉटेल रुमवर बोलावले होते. १९९५ ते १९९७ दरम्यान त्यांनी एम.जे.अकबर यांच्यासोबत काम केले. अकबर यांनी मला सुद्धा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी त्यांच्या हॉटेल रुमवर बोलावले होते. मला मला काही गोष्टींची कल्पना होती. मी येणार म्हणून होकारही कळवला होता. पण नंतर मी गेलीच नाही. झोपून राहिल्यामुळे मी येऊ शकले नाही असे मी त्यांना कळवले. त्यांनी सुद्धा ती गोष्ट समजून घेतली. त्यानंतर त्यांनी मला कधीही त्रास दिला नाही. मी माझे काम करत राहिले असे त्यांनी सांगितले.

सूपर्णा शर्मा या महिला पत्रकाराने सुद्धा अकबर यांच्यावर अशाच प्रकारचे आरोप केले आहेत. त्यावेळी मी २० वर्षांची होते. एक नव्या वर्तमानपत्राच्या लाँचिंगचे आम्ही काम करत होतो. त्यावेळी एम.जे. अकबर माझे वरिष्ठ होते. एक दिवस मी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानाचे काम करत होती. त्यावेळी अकबर माझ्या मागे येऊन उभे राहिले. त्यांनी माझ्या अंर्तवस्त्राला हात घातला. ते त्यावेळी काही तरी बोलले ते मला आता आठवत नाही पण त्यांच्या या वर्तनाने माझा पारा चढला व मी त्यांच्यावर ओरडले असे शर्मा यांनी सांगितले. सध्या त्या एशियन एजमध्ये कार्यकारी संपादक आहेत.

एकदा टी-शर्ट घातलेला असताना सुद्धा असाच अनुभव आला. टी-शर्ट घालून मी एम.जे.अकबर यांच्या केबिनमध्ये गेले. त्यावेळी सुद्धा मला असाच अनुभव आला पण मी त्याकडे दुर्लक्ष केले असे शर्मा यांनी सांगितले. शुमा राहा या महिला पत्रकाराने सुद्धा असाच आरोप केला आहे. १९९५ मध्ये कोलकाताच्या ताज पॅलेसमध्ये एम.जे. अकबर यांनी अश्लिल ऑफर दिली होती, त्यानंतर मी त्या नोकरीला नकार दिला असं या महिलेने केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

७ ऑक्टोंबरला पत्रकार प्रेरणा सिंह बिंद्रा यांनी सुद्धा एक टि्वट करुन हॉटेलमध्ये बोलवण्याचा अनुभव सांगितला होता. पण त्यावेळी त्यांनी एम.जे. अकबर यांचे नाव घेतले नव्हते. मात्र सोमवारी संध्याकाळी त्यांनी एम.जे. अकबर यांचे नाव घेतले. शुतापा पॉल या आणखी एका महिला पत्रकाराने सुद्धा एम.जे.अकबर यांच्यावर आरोप केले आहेत.