# मी टू : दिया मिर्झाचाही साजिद खानवर आरोप

0
11

साजिदचे महिलांप्रती वर्तन घृणास्पदच असल्याचा दावा

दियानं साजिदच्या ‘हे बेबी’ चित्रपटात एक लहानशी भूमिका साकारली होती. त्यावेळीदेखील साजिदचं वागणं खूपच अस्वस्थ करणार होतं, असंही दिया म्हणाली.

महिलांशी केलेल्या असभ्य वर्तणुकीमुळे साजिद खान हा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आता अभिनेत्री दिया मिर्झानंदेखील साजिदचं महिलांप्रती असलेलं वर्तन हे नेहमीच घृणास्पद असतं, असं म्हणत साजिदवर आरोप केलेल्या पीडितांना पाठिंबा दर्शवला आहे.

दियानं साजिदच्या ‘हे बेबी’ चित्रपटात एक लहानशी भूमिका साकारली होती. त्यावेळीदेखील साजिदचं वागणं खूपच अस्वस्थ करणार होतं, असंही दिया एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती म्हणाली. ‘साजिद खानबद्दल गेल्या काही दिवसांपासून मी ज्या बातम्या ऐकत आहे त्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. त्याचं वागणं हे किळसवाणं असतं. त्याच्यावर जे काही आरोप करण्यात आले आहेत, आणि पीडित महिलांनी जे अनुभव सांगितले आहेत ते खूपच धक्कादायक आहेत. सुदैवानं मला इतका वाईट अनुभव आला नाही. साजिदचं महिलांप्रती वागणं घृणास्पद आहेच पण तो इतका वाईट वागू शकतो याची मी कधी कल्पनाही केली नव्हती.’ असं म्हणत दियानं साजिदच्या वागण्यावर आपली नाराजी दर्शवली आहे.

‘मी साजिदसारख्या लोकांपासून नेहमीच लांब राहते अशा माणसांसोबत कोणतंही नातं ठेवायला मला आवडत नाही. या प्रकरणात नक्कीच आणखी नावं समोर येतील. साजिदकडून वाईट वर्तणुक मिळालेल्या आणखीही महिला असतील पण काही कारणामुळे त्या गप्प बसल्या असतील. पण, त्यांनी देखील पुढे यायला हवं’ असंही ती म्हणाली.

साजिदवरील आरोपांमुळे ‘हाऊसफुल ४’ मधील अभिनेता अक्षय कुमारनं साजिदसोबत काम न करण्याचं ठरवलं आहे. तर दुसरीकडे साजिद खानची बहिण फराह खान हिनं देखील साजिदवर टीका करत या प्रकरणात त्याची साथ न देण्याचं ठरवलं आहे.