नाशिकमधील पिंपळगाव टोलनाका महिलांच्या हाती.

0
22

नाशिक : टोलनाका म्हटलं की आंदोलन, राडा, पैशांची लूट असेच चित्र डोळ्यासमोर येते. मात्र पिंपळगावचा टोलनाका त्याला अपवाद ठरला आहे. केवळ अपवाद नव्हे, तर तेथील व्यवस्थापनामुळे आदर्श ठरला आहे. कारण 70 ते 80 महिलांच्या माध्यमातून या टोलनाक्याचे कामकाज चालवले जात आहे.

तसे पाहिले तर महिलांसाठी आता कुठलेच क्षेत्र वर्ज्य राहिले नाही. सगळ्याच क्षेत्रात महिला अत्यंत हुशारीने आणि यशस्वीपणे पाऊल ठेवत आहेत. आता यात टोलप्लाझाही अपवाद राहिला नाही.

नाशिक-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव टोलनाका महिलांचे व्यवस्थापन गुण दाखविणारे उत्तम उदाहरण ठरला आहे. 2012 पासून या टोलनाक्याचा कारभार महिलांकडून सांभाळला जातो आहे. वाहनचालकांना शिस्त लावून वाहने रांगेत उभी करणे असो, वा त्यांच्याकडून टोल आकारण्यातून आलेल्या पैशांचा हिशोब ठेवणे असो, सुरक्षा पुरवणे असो की ऑडीट करणे असो, अशी लेन असिस्टंटपासून शिफ्ट इन्चार्जपर्यंतची सर्वच कामं महिला करत आहेत.

70 ते 80 महिलांच्या माध्यमातून तीन शिफ्टमध्ये टोल नाक्यावर काम केले जाते. दिवसाला साधारणत: सहा ते साडेसहा हजार वाहनं टोलनाक्यामधून जातात. रोजच्या अनेक कडू-गोड आठवणी आणि प्रसंगाला सामोर जाण्याची वेळ या महिलांवर येते. कोणी तिरसट लोक भेटतात तर कोणी महिलांचा आदर करणारे.

काम करण्याची इच्छा आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तर कुठल्या क्षेत्रात काम करतो, याला अर्थ राहत नाही. हेच या महिलांनी दाखवून दिले आहे. कामाप्रती असणारी त्यांची श्रद्धा आणि धडपड इतरांना नक्कीच प्रेरणा देणारी ठरत आहे.