अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन

0
23

मुंबई | हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याचदिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर बसून जोरदार घोषणाबाजीने परीसर दणाणून सोडला. सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत सरकारला कसे ‘सळो की पळो’ करुन सोडणार याची चुणूक दाखवून दिली.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांनी सरकारला जनतेच्या प्रश्नावर कोंडीत पकडण्याची रणनिती आखली आहे. यावेळी घोषणाबाजी करताना ‘ठग्ज ऑफ महाराष्ट्र’ असे पोस्टर फडकवून सरकारचा निषेधही नोंदवला गेला. विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेतील आमदार शशिकांत शिंदे, विधानपरिषदेतील आमदार हेमंत टकले आणि काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील आदींसह राष्ट्रवादीचे दोन्ही सभागृहातील आमदार सहभागी झाले होते.