बीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या

भांडण सोडवताना झाला हल्ला

बीड | भाजप नगरसेवक विजय जोगदंड यांची अंबाजोगाईत हत्या करण्यात आली आहे. जोगदंड यांच्यावर अज्ञातांनी तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात जोगदंड यांचा जागीच मृत्यू झाला. अंबाजोगाई शहरातील परळी वेस भागात हा धक्कादायक प्रकार घडला. जोगदंड यांच्या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यातील आरोपी फरार आहेत. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

प्राथमिक माहितीनूसार, परळी वेस परिसरात काही किरकोळ भांडणं सुरु होती. विजय जोगदंड तिथे भांडण सोडवण्यासाठी गेले होते. मात्र वाद इतका विकोपाला गेला की, अज्ञातांनी जोगदंड यांनांच लक्ष्य केले आणि त्यांच्यावर तलवारीने वार केले. यामध्ये जोगदंड जागीच कोसळले. नंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जोगदंड यांना स्थानिकांनी बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नगरसेवक जोगदंड यांची हत्या राजकीय वैमनस्यातून झाली की यामागे दुसरे कारण आहे, याचा पोलिस तपास करत आहेत.