बेस्ट कर्मचारी संपाचा आज तिसरा दिवस, मुंबईकरांचे हाल

मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरुच आहे. यामुळे मुंबईकरांचे आजही हाल होत आहेत. कर्मचारी संपावर ठाम असल्याने मुंबईत बस डेपोमधून एकही गाडी बाहेर पडलेली नाही. संपाबाबत बैठकींचे सत्र सुरु आहेत. दोन दिवसांपासून कामगार संघटना आणि बेस्ट प्रशासन यांच्यात बैठका झाल्या, पण त्या फोल ठरल्या. दरम्यान, संपकरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बेस्ट वसाहतीतील घरे खाली करण्याचे आदेश प्रशासनाने दिला आहे. यामुळे संप आणखी चिघळला आहे. बेस्टचे कर्मचारी संपावर ठाम असून जोवर मागण्या लेखी मान्य होत नाहीत तोवर संप सुरूच राहणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

तर, मनसेने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. पण या भेटीमध्ये राज ठाकरे यांनी ‘बघतो, बोलतो’ असे सांगत बेस्ट कर्मचाऱ्यांना मोघम आश्वासन दिले आहे. तसेच, काहीही झाले तरी एकजूट राहा, असा सल्लाही राज ठाकरेंनी कर्मचाऱ्यांना दिला.