बहुचर्चित ‘केदारनाथ’ चित्रपटावर उत्तराखंडमध्ये बंदी

बहुचर्चित ‘केदारनाथ’ चित्रपटावर उत्तराखंडमध्ये बंदी घालण्यात आलीय. केदारनाथ ही हिंदु धर्मीयांची पवित्र जागा आहे. याच ठिकाणी चित्रपटातील काही आक्षेपार्ह दृश्य चित्रित करण्यात आलीय, असं म्हणत अनेकांनी या चित्रपटाला विरोध दर्शवला होता. स्थानिक नागरिकांनी आणि मंदिरातील पुजाऱ्यांनीही चित्रपटावर बंदी घालण्यीच मागणी केली. त्यामुळं या चित्रपटावर संपूर्ण राज्यात बंदी घालण्यात आलीय, अशी माहिती पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी दिली.

जिल्ह्याधिकाऱ्यांना राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही याची खबरदारी घेण्याचा आदेश दिला आहे. आमच्या समितीने ‘केदारनाथ’ सिनेमावर बंदी घालण्यास सर्वानुमते मंजुरी दिलीय. असंही सतपाल महाराजांनी सांगितले.

चित्रपटामध्ये अभिनेत्री सारा अली खान आणि सुशात सिंह राजपूत मुख्य भुमिकेत आहे. आज संपूर्ण देशभरात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सिनेमाची टॅगलाईन आणि टायटलवरही स्थानिकांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून उत्तराखंडमध्ये या सिनेमावर बंदी घालण्यात आलीय, असं सतपाल महाराज यांनी स्पष्ट केलं आहे.