अयोध्या प्रकरण : 29 जानेवारीला नव्या घटनापीठासमोर सुनावणी, न्या. लळित यांची माघार

नवी दिल्ली | अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. पुढील सुनावणी 29 जानेवारी रोजी नव्या घटनापीठासमोर होणार आहे. आज पाच न्यायमूर्तींचे नवे घटनापीठ अयोध्या प्रकरणावर सुनावणी करणार होते. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील या घटनापीठात न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती उदय लळित, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एन व्ही रमण्णा यांचा समावेश होता. सुनावणीदरम्यान मुस्लीम पक्षकाराचे वकील राजीव धवन यांनी घटनापीठातील न्यायमूर्ती उदय लळित यांच्यावर आक्षेप घेतला. न्या. लळित हे याच प्रकरणात वकील म्हणून 1994 मध्ये उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या बाजूने कोर्टात उभे होते. त्यांनतर न्यायमूर्ती लळित यांनीही घटनापीठातून आपण बाहेर पडू इच्छितो, असे सरन्यायाधीशांना सांगितले. यावर नवं घटनापीठ स्थापन करून त्यासमोर 29 जानेवारीला सुनावणी होईल, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.