गावाला रस्ता नाही म्हणून ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

1

बीड | आष्टी तालुक्यात असणाऱ्या कारखेल बू. येथील गावकऱ्यांनी, गावाला रस्ता नसल्याने लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी गावातील काही नागरिकांनी संबधित तहसीलदारांना देखील निवेदन दिले. विशेष म्हणजे हे गाव ज्या आष्टी तालुक्यात येते त्या आष्टी तालुक्यात, भाजपाचे दोन विद्यमान आमदार व एक भाजपचे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. एवढेच नाही तर गावाची ग्रामपंचायत देखील भाजपच्याच ताब्यात आहे.

आष्टी तालुक्यातील कारखेल बू. येथील सांगवीफाटा ते कारखेल बु. हा 5 किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला असल्याने येथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत हा रस्ताच झाला नाही असे गावकरी म्हणत आहेत. गावातील वृध्द तसेच गर्भवती महिलांना दवाखान्यात घेऊन जाताना मोठी अडचण निर्माण होते. चारचाकी वाहन आणण्यासाठी आधी रस्त्यावरील खड्डे बुजावे लागतात आणि नंतरच चार चाकी वाहन गावाकडे आणवे लागते. गावात अडीच हजार लोकसंख्या असून गावात लोकप्रतिनिधीने लक्ष दिले नाही. रस्त्याचे काम सुरू करुन जोपर्यंत रस्ता दुरुस्त होत नाही. तोपर्यंत आम्ही लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे येथील नागरीकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

विशेष म्हणजे भाजपचे आमदार सुरेश धस, भीमराव धोंडे भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्ष सविता गोल्हार आणि गावाची ग्रामपंचायत देखील भाजपच्याचं ताब्यात आहे. तरी देखील गावाला रस्ता मिळाला नाही, यामुळे बहिष्काराचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. दिलेल्या निवेदनावर सोमनाथ पवार, बद्रीनाथ पवार, गणेश पवार, बाबुराव पवार, लक्ष्मण कवळे, पांडुरंग बोरसे, किशोर पवार, अंबादास बोरसे, समाधान पवार, सचितानंद पवार, निलेश पवार, योगेश पवार आदीच्या सह्या आहेत.