जीएसटी कपातीचे अरुण जेटलींचे संकेत, आणखी काय स्वस्त होणार?

नवी दिल्ली | 17 वस्तूंवरील जीएसटी कमी करून नागरिकांना ख्रिसमस गिफ्ट देणाऱ्या मोदी सरकारने जीएसटीमध्ये आणखी कपात करण्याचे संकेत दिले आहेत. 12 आणि 18 टक्क्यांच्यामध्ये आणखी एक जीएसटी स्लॅब बनवण्यात येवू शकतो, असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटले आहे. यामुळे भविष्यात आणखी काही वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे.

‘जीएसटीचे 18 महिने’ या शीर्षकाखाली अरूण जेटली यांनी एक ब्लॉग पोस्ट केला आहे. त्यात जीएसटीचे नवीन दर लवकरच लागू करण्यात येणार, अशी घोषणा त्यांनी केली आहे. सर्वसामान्य वापरत असलेले केवळ सिमेंट आणि ऑटो पार्ट्स हे 28 टक्क्यांच्या कक्षेत राहिले आहेत. त्यामुळे आमची पुढील प्राथमिकता ही सिमेंटवरील टॅक्स कमी करण्याची राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

183 वस्तूंवरील टॅक्स शून्य आहे. 308 वस्तूंवर 5 टक्के जीएसटी आहे. 178 वस्तूंवर 12 टक्के तर 517 वस्तूंवर 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये दिली आहे. तसेच 28 टक्क्यांचा टॅक्स स्लॅबही लवकरच संपुष्टात येणार असल्याचे, त्यांनी म्हटले आहे.