पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव एसटीची टँकरला धडक, अपघातात 9 प्रवासी जखमी

पुणे । पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंड गावाजवळ भरधाव एसटीची टँकरला धडक होऊन मोठा अपघात झाला. शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात बसमधील नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून एसटीचालक गंभीर आहे. त्यांना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

वरवंड गावाजवळ टँकर पुढे जात असताना शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास भरधाव एसटीने पाठीमागून धडक दिली. या धडकेत एसटीचा समोरचा भाग पूर्णपणे चेपला असून टँकरचेही नुकसान मोठे झाले आहे. एसटी चालक गंभीर जखमी असल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातानंतर यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टँकर चालकाच्य फिर्यादीवरून अपघाताची नोंद केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले.