विजेची तार गोठ्यावर पडल्यानं 9 गायींचा मृत्यू, नगरमधील घटना

अहमदनगर | संगमनेर तालुक्यात विजेची तार गोठ्यावर पडल्याने 9 गायींचा मृत्यू झाला आहे. कनोली गावात ही दुर्घटना घडली. गोठ्याजवळून गेलेली विजेची मुख्य तार अचानक गोठ्यावर पडल्यामुळे विजेच्या धक्क्याने गायींचा जागीच मृत्यू झाला. महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळं ऐन दुष्काळात नानासाहेब वर्पे या शेतकऱ्याचं लाखो रूपयांचं नुकसान झालं आहे. तर, 9 गायींच्या मृत्यूमुळे वर्पे कुटुंबिय आर्थिक संकटात सापडलेत. यामुळं महावितरणाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी संतप्त गावकऱ्यांनी केली आहे.