कोल्हापुरात 71 लाखांचे दागिने जप्त, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

कोल्हापूर | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कडक नाकाबंदी सुरू आहे. कोल्हापूरच्या सरनोबतवाडी टोल नाक्यावर स्थिर निरीक्षण पथकाच्या नाका-बंदी दरम्यान एका चारचाकी वाहनातून 71 लाखाचे सोने आणि हिरे जप्त करण्यात आले आहेत. कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या सरनोबतवाडी टोल नाका येथील तपासणी नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. या घटनेची पोलिसांसह प्राप्तिकर अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.

लोकसभेची आचारसंहिता लागल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 48 ठिकाणी स्थिर निरीक्षण पथकाची नाकाबंदी सुरू आहे. या नाका-बंदी दरम्यान पोलिसांनी जवळपास दोन कोटींचा मुद्देमाल आजपर्यंत जप्त आहे. यात सुमारे एक कोटी रुपयांची रोकड तर सोने आणि मद्यचा एक कोटी रुपयांचा साठा जप्त केला आहे. शिवाय 21 लाखांच्या बनावट नोटा ही जप्त केल्याचे समोर आले होते.

दरम्यान राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणारा सरनोबतवाडी येथे स्थिर निरीक्षण पथकाची टोल नाक्यावर ती नाकाबंदी सुरू होती. या नाका-बंदी दरम्यान पोलिसांना तेथून जाणाऱ्या निळा चार चाकी गाडीवरती संशय आला होता. त्यांनी या गाडीची तपासणी केली तर या गाडीत असणारे एका कापडी पिशवीत 71 लाखाचे दागिने आणि हिरे आढळले. तसेच पोलिसांनी दागिन्याबाबत अधिक चौकशी केली असता कागदपत्रांमध्ये विसंगती आढळली. यानंतर नाकाबंदी सुरू असणाऱ्या स्थिर निरीक्षण पथकाने सर्व दागिने जप्त करून कर्मचाऱ्यांसह ती चार चाकी व्हॅन राजारामपुरी पोलीस ठाण्यात आणली आणि आयकर अधिकारी यांच्यासमवेत याची पंचनामा केला. पोलिसांनी पकडलेले दागिणे कोल्हापुरातील एका ज्वेलर्सचे असल्याचं वृत्त आहे. परंतु पोलिसांनी याबाबत कोणताही दुजोरा दिलेला नाही.