शेतकरी कुटुंबातील 65 वर्षांच्या आजीने घेतली आकाशात भरारी, लिम्का बुकात विक्रम

5

दिग्रस | इच्छाशक्ती मजबूत असली की जीवनात समस्त आसमंताला गवसणी घालता येते. त्याला वयाचे बंधन आडवे येत नाही की परिस्थिती ही रोखू शकत नाही. असाच आदर्श येथील शेतकरी कुटुंबातील सदुसष्ट वर्षाच्या सविता विनायकराव पदमावार यांनी घडविला आहे. लिम्का बुकात आपले नाव नोंदवून त्यांनी स्त्रीच्या संकल्पशक्तीचा परिचय दिला आहे.

दिग्रस येथील शिवाजी नगर मध्ये राहणाऱ्या पदमावार शेतकरी कुटुंबावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचे कारण ही तसेच आहे. एका शेतकरी कुटुंबातील गृहिणी असलेल्या सविता विनायकराव पदमावार यांनी वयाच्या पासष्टी मध्ये चक्क आकाशाला गवसणी घातली आहे. त्यांनी चक्क पंधरा हजार फुटावरून स्कायडायविंग करून या रोमांचक खेळ प्रकारात या वयोगटातील देशातील सर्वाधिक वयाच्या यादीत पहिला क्रमांक मिळविला आहे. याची दखल लिम्का बुक ऑफ रेकार्डस् ने घेतली असून विक्रमवीरांच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट केले आहे.

आस्ट्रेलिया येथील किल्डा बीच मेलबॉर्न येथे मागील वर्षी त्यांनी हे धाडस केले. त्या यशस्वी कामगिरीची दखल लिम्का बुक ऑफ रेकार्डसकडे पाठविण्यात आली होती. त्याची सविस्तर पडताळणी करून अखेर त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकार्डस 2019 या प्रकाशनात घेण्यात आली आहे. याची माहिती मिळताच कुटुंबीय आणि आप्तस्वकीयांमध्ये आनंद पसरला आहे.

त्यांचे पती विनायकराव शेती करतात. मोठा मुलगा आस्ट्रेलिया मध्ये इंजिनियर आहे तर लहान मुलगा विवेक येथे व्यवसायिक आहे आणि मुलगी शिल्पा अमेरिकेत राहते. विशेष लक्षणीय बाब अशी की सविता पदमावार यांच्या इच्छेला पाहता त्यांची मोठी सूनबाई लीना हिने भरपूर साथ दिली. आपल्या आगळ्या वेगळ्या छंदा बद्दल त्यांनी सांगितले की विमानातून ऊडी घेतल्या नंतर एक मिनीटे फ्रीफॉल टाईम असतो. म्हणजे पॅराशूट न उघडता अगदी दगडा प्रमाणे पूर्ण वेगाने खाली येण्याचा काळ खूपच थरारक असतो तर पॅराशूट खुलल्या नंतर जरा आल्हादक वाटतो. अगदी काही मिनिटामधील हे दोन्ही अनुभव खूपच अद्भुत होते. असा अनुभव त्यांनी यावेळी सांगितला.

सेवानिवृत्त झाल्यानंतर किंवा वय झाल्यानंतर अनेक लोक आयुष्य संपले आता काहीच करायचे नाही असे समजतात. अशा सर्वांसाठी त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. शिवाय ज्या छंदवेडयांना आपल्या छंदाला पंख देण्यात अडचणी आल्या आहे किंवा छंद प्रत्यक्षात उतरविता आले नाही अशा सर्वांसमोर त्यांनी उदाहरण ठेवले आहे की इच्छा कधीही प्रत्यक्षात उतरविता येते फक्त प्रांजळ प्रयत्नाचे सातत्य असावे लागते अशा त्या म्हणाल्या.