खोपोलीत साडे चार वर्षांच्या चिमुरडीची निर्घृण हत्या, नरबळी किंवा बलात्काराचा संशय

425

खोपोली । खोपीली शहरानजीक शिळफाटा परिसरातील आडवाटेच्या झुडुपात पोलिसांना एका साडे चार वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह सापडला. अतिशय क्रूर पद्धतीनं या चिमुरडीला ठार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन चिमुरडीचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस घटनेचा पंचनामा करत आहेत. आशा असे मृत मुलीचे नाव आहे.

या मुलीचे धड आणि शीर असे दोन तुकडे करून झाडीत वेगवेगळया ठिकाणी फेकले होते. तिच्‍या शरीरावर अनेक ठिकाणी चटके दिल्‍याच्‍याही खुणा पोलिसांना आढळून आल्या. त्‍यामुळे हा नरबळीचा प्रकार असावा, असा संशय पोलिस व्यक्त करत आहेत. परंतु, महिला कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चिमुरडीच्या मृतदेहाची पाहणी केली असता तिच्‍यावर बलात्‍कार झाल्याचा संशय व्‍यक्‍त करण्यात येत आहे. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृददेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

कुटुंबावर शोककळा
या मुलीचे कुटंब मूळचे उत्‍तर प्रदेशातील असून या हंगामात मोल-मजुरीसाठी ते महाराष्‍ट्रात आले होते. तिचे वडील ट्रॅक्‍टर चालवण्‍याचे काम करतात. मंगळवार सकाळपासून आशा बेपत्‍ता होती. तिच्‍या कुटुंबियांनी तिचा शोध घेण्‍याचा प्रयत्‍न केला परंतु ती सापडली नाही. बुधवारी सकाळी तिचा मृतदेह सापडल्‍याची बातमी येताच तिच्‍या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत पाटील यांच्‍यासह इतर पोलीस अधिकारी घटनास्‍थळी दाखल होऊन तपास वेगाने सुरू केला. दरम्‍यान या दुर्दैवी घटनेने खोपोली शहर आणि परिसरात खळबळ उडाली होती.