प्रियंका गांधींची ‘गंगा यात्रा’, प्रयागराज ते वाराणसीपर्यंत बोटमधून करणार 140 किमीचा जलप्रवास

0

एएम न्यूज नेटवर्क | लोकसभा निवडणुकीत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष भाजप आणि मोदींच्या विरोधात नवनवीन रणनीती आखत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रियंका गांधी 140 किमीची ‘गंगा यात्रा’ करणार आहेत.

दिल्लीच्या खुर्चीकडे जाणारा राजमार्ग उत्तर प्रदेशातून जातो असे म्हणतात. त्यामुळेच सत्तेमध्ये नेहमीच पक्षांची उत्तर प्रदेशातील कामगिरी महत्त्वाची ठरत असते. त्यामुळेच काँग्रेसने प्रियंका गांधींना मैदानात उतरवत त्यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवली आहे. उत्तर प्रदेशात जर काँग्रेसला मोठे यश मिळाले तर मोदींना धक्का देण्यात यश मिळेल याची काँग्रेसला खात्री आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशात काही खास विविध मार्गांनी प्रचाराची मोहीम आखली जात आहे. त्यासाठीच प्रियंका गांधी तीन दिवसांची ‘गंगा यात्रा’ काढत आहेत.

अशी असेल यात्रा

प्रियंका गांधींची गंगा यात्रा ही तीन दिवस चालणार आहे. 140 किलोमीटरचा जलमार्गाद्वारे प्रवास प्रियंका गांदी या दौऱ्यामध्ये करणार आहेत. तीन दिवसांच्या या यात्रेची सुरुवात 18 मार्च रोजी प्रयागराज येथील छटनाग येथून होणार आहे तर या यात्रेचा समारोप वाराणसीतील प्रसिद्ध अस्सी घाटावर होणार आहे. या तीन दिवसांच्या जलमार्गाच्या प्रवासात प्रियंका गांधी मार्गात लागणार्या गावांतील रहिवाशांच्या भेटीही घेणार आहेत.