चोरांनी पैसे समजून पळविल्या 12 वीच्या उत्तरपत्रिका, लातुरातील घटना

2
लातूर | जिल्ह्यातील  निलंगा तालुक्यात 12 वीच्या उत्तरपत्रिका चोरीला गेल्याची घटना घडली आहे. निलंगा बसस्थानकच्या समोरील बाजूस उभ्या करण्यात आलेल्या बोलोरो गाडीची काच फोडून चोरटयांनी एक बॅग पसार केली. पैशांची बॅग समजून त्यांनी चक्क 12 वी च्या 55 उत्तरपत्रिकांचा गठ्ठाच पळवल्याची खळबळजनक घटना गुरुवारी घडली. निलंगा पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. आता या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार आहे.
लातूरच्या निलंगा तालुक्यातील केळगाव येथील आनंदमुनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक 12 वी रसायनशास्त्राच्या 25 व मराठीच्या 30 अशा 55 उत्तरपत्रिकांचा संच घेऊन नियामकाकडे जमा करण्यासाठी बोलोरो गाडीतून जात होते. या दरम्यान निलंगा येथील बँकेतून त्यांनी पैसे काढले. यानंतर त्यांनी चहा पिण्यासाठी निलंगा बसस्थानकासमोरील एका हाँटेलसमोर गाडी उभी केली.  या दरम्यान बँकेतून निघाल्यापासून पाळत ठेवलेल्या चोरट्यांचा गाडीत पैसेच असावेत असा समज झाला. चोरट्यांनी उजव्या बाजूची काच फोडून गाडीतील 12 वी रसायनशास्त्र व मराठी विषयाच्या एकूण 55 उत्तरपत्रिकेचा गठ्ठाच पळविला आहे. काही वेळाने परतलेल्या शिक्षकांना काच फुटलेली, समोरच्या टायरची हवा सोडलेली दिसली. गाडीतील 55 उत्तरपत्रिकेचा गठ्ठाच चोरी गेल्याचे निदर्शनास आले. यानंतर एकच खळबळ उडाली.
या घटनेची माहिती तत्काळ पोलीस निरीक्षक अनिल चोरमले यांना कळविण्यात आली. आश्चर्य म्हणजे चोरमले यांनी तत्काळ कारवाई करण्याऐवजी तक्रारदार शिक्षकांनाच पत्रिका शोधण्यासाठी उदगीरमोड, कासारशिरसी मोड बसस्थानक परिसरात जाण्यास सांगितले. या घटनेमुळे या 55 विद्यार्थ्यांचे काय होईल? त्यांच्या भविष्यावर यांचा या परिणाम होईल असा प्रश्न उपस्थित होतो.