जालियनवाला बाग हत्याकांडाला 100 वर्षे पूर्ण, राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली | अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाला शनिवारी 100 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांद्वारे शहिदांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आणि पंजाबचे राज्यपाल या कार्यक्रमात शहिदांना श्रद्धांजली वाहणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शनिवारी सकाळी अमृतसर येथे पोहोचले. त्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंहदेखील त्यांच्यासोबत होते.

भारतात ब्रिटिशांची जुलमी राजवट होती. याच काळात जालियनवाला बाग हत्याकांड घडले होते. या घटनेत जनरल डायरने निरपराध जनतेवर बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले. या घटनेला आज 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विशेष नाणे आणि टपाल तिकीटाचे प्रकाशनही करण्यात आले.

काय आहे जालियनवाला बाग हत्याकांड

13 एप्रिल 1819 मध्ये ही घटना घडली होती. बैसाखीच्या निमित्ताने या बागेत 15 ते 20 हजार भारतीय नागरिक उपस्थित होते. पंजाबच्या दोन नामवंत नेत्यांना अटक आणि रोलेट अॅक्टच्या विरोधात ही सभा ठेवण्यात आली होती. या सभेच्या दोन दिवसांपूर्वीच अमृतसर आणि पंजाबमध्ये काही घटना घडल्या होत्या, यामुळे ब्रिटश सरकार रागात होते. याच रागात ब्रिटिश सरकारने त्यांच्या जनरल डायरला अमृतसर येथे पाठवले. जनरल डायरने 90 सैनिकांना सायंकाळी चार वाजता जालियनवाला बागेत पाठवून नागरिकांवर बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले.

या गोळीबारात अनेक भारतीयांनी प्राण गमावले. ज्या विहिरीत लोक प्राण वाचवण्यासाठी उतरेल होते त्याच विहिरीत 120 मृतदेह सापडले होते. जवळपास दहा मिनिटांमध्ये 1650 राउंड गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यानंतर गोळ्या संपल्यामुळे गोळीबार थांबवण्यात आला होता. ब्रिटिश सरकारने प्रसिध्द केलेल्या आकड्यांनुसार मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या केवळ 379 एवढी सांगण्यात आली. तर 1200 लोक जखमी झाल्याचे सांगण्यात आले. मात्र यापेक्षा जास्त लोकांचा यामध्ये मृत्यू झाल्याचे बोलले जाते.