मेथीची भाजी खाल्ल्याने 7 जणांना विषबाधा, एकाचा मृत्यू

नांदेड | उमरी तालुक्यात मेथीची भाजी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा झाली आहे. यातील एकाचा मृत्यू झाला असून उर्वरित सहा जणांना उपचारासाठी नांदेडमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. कोंडीबा गंगाराम कदम (वय 65 वर्ष) असे मृताचे नाव आहे.

कळगाव येथे कोंडीबा कदम यांच्या घरी गुरुवारी सकाळी जेवणात मेथीची भाजी होती. जेवणानंतर घरातील सर्वच सदस्यांना पोटदुखीचा त्रास सुरु झाला. यानंतर सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सहा जणांना घरीही पाठवण्यात आले. मात्र कोंडीबा कदम यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी संध्याकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शुक्रवारी सकाळी भागाबाई गणपतराव पुयड, आनंदा कोडीबा कदम (वय 30), कल्पना कोंडीबा कदम (वय 28), पदमीनबाई मारोती कदम (वय 40), श्लोक शिवाजी कदम (वय 4) यांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरु झाला. शेवटी सर्वांना नांदेडमधील रुग्णालयात हलवण्यात आले.

दरम्यान, मेथीच्या भाजीने मृत्यू ओढावण्याची ही पहीलीच घटना नाही. काही दिवसांपूर्वीच जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात मेथीची कच्ची भाजी खाल्ल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता. अंजूबाई पाटील असे या महिलेचे नाव आहे. मेथीवर फवारलेल्या किटकनाशकामुळे या महिलेचा मृत्यू झाला, अस शवविच्छेदन अहवालात समोर आल आहे. यामुळे बाजारातून किंवा मॉलमधून आणलेल्या भाज्या स्वच्छ धूवून घेणे गरजेचे असल्याचे आहारतज्ञांचे म्हणणे आहे.