पुणे: मजुराला खाऊ घातली मानवी विष्ठा, वीटभट्टी मालकावर गुन्हा दाखल

4

मुळशी | क्षुल्लक कारणावरून वीटभट्टी मालकाने मजुराला बेदम मारहाण करत त्याला मानवी विष्ठा खाऊ घातल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास हिंजवडीजवळील जांबे येथे ही घटना घडली. घडलेल्या प्रकारानंतर पीडित तरुणाने तत्काळ पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

घटनेतील पीडित 22 वर्षीय मजूर हा आरोपी संदीप पवार याच्या वीटभट्टीवर काम करत होता. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास पीडित मजूर आणि त्याचे कुटुंब हे जेवण करून बसले. काही वेळाने आरोपी मालक संदीप पवार आला आणि त्याने कामावर उशिरा येण्याचा जाब विचारला, तेव्हा दोघांमध्ये मोठा वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर आरोपी संदीप पवार याने मजुराला मारहाण केली. यानंतर त्याच्या पत्नीला मानवी विष्ठा आणण्यास सांगितले. मजुराला बेदम मारहाण करत विष्ठा खाण्यास भाग पाडले. दरम्यान, या संतापजनक घटनेनंतर पीडित मजुराने हिंजवडी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.