‘भारतच विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार’ : सचिन तेंडुलकर

भारतीय संघच विश्वचषकात विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. असा विश्वास सचिन तेंडुलकरने व्यक्त केलाय. आयसीसी विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर असताना, या स्पर्धेत कोण आपली चमक दाखवणार? कोण या स्पर्धेचा विजेता ठरणार? अशा चर्चा रंगल्या आहेत. या चर्चेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपलं मत मांडलंय. “विश्वचषक स्पर्धेसाठी जेव्हा मी संघांचा विचार करतो, त्यावेळी मला भारतीय संघ प्रबळ दावेदार वाटतो. भारतीय संघ संतुलित आहे. संघात सर्वोत्तम खेळाडू आहेत. त्यामुळं भारताला विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची सर्वाधिक संधी आहे’, असं सचिननं म्हटलंय.

वर्ल्ड कपमध्ये बुमराह प्रतिस्पर्धींसाठी घातक ठरेल: सचिन 

वर्ल्ड कपमध्ये भारताचा जसप्रीत बुमराह प्रतिस्पर्धी संघासाठी कर्दनकाळ ठरेल, असंही सचिन म्हणालाय. गेल्या काही सामन्यांत बुमराहनं त्याच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीनं भल्याभल्या फलंदाजांना हतबल केलं. आयसीसी वन डे क्रमवारीतील गोलंदाजांत त्यानं अव्वल स्थानही पटकावलंय. त्यामुळं वर्ल्ड कप स्पर्धेत बुमराह हा भारतीय संघाचा ट्रम्प कार्ड ठरेल, असं सचिनला वाटतंय. सचिन म्हणाला, ‘बुमराहच्या यशाचं मला आश्चर्य वाटलेले नाही. तो मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य आहे आणि त्याचा खेळ मी जवळून पाहिलाय. वर्डकपमध्ये फलंदाजांना त्याचा सामना करताना संघर्ष करावा लागेल.