दोन वर्षांपासून अण्णांच्या उपोषणावर बोलणे, वाचणे सोडले : शरद पवार

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषण या विषयावर बोलणे आणि त्यासंबंधित बातम्या वाचणे मी गेली दोन वर्षे सोडून दिलं आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. बारामती येथील बैठकीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. ‘अण्णा हजारे यांच्याविषयी काही पाहणे आणि बोलायचे नाही असं मी दोन ते तीन वर्षांपूर्वीच ठरवले आहे. त्यांच्याबद्दल कुठलिही बातमी छापून आली तरी मी ते वाचत नाही,’ असा टोला शरद पवार यांनी लगावला.

पुढे बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संसदेतील गुरुवारचे भाषण वाचनात आले. त्यांचे भाषण प्रथेला धरून नव्हते. त्यांच्यावर जसे संस्कार झाले, त्यानुसारच ते बोलले आहेत,अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींवर निशाणा साधला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. यावर ते म्हणाले की, लोकसभेसोबत विधानसभा एकत्र झाली. तर महाराष्ट्रातील जनतेची सात महिने अगोदर सुटका होईल, अशा शब्दात त्यांनी भाजपावर निशाणा साधला.