मोबाईल आणि मेंदूच्या कर्करोगाचा संबंध शोधण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी यूकेमधील ४ लाख लोकांवर संशोधन केले.
मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकदा अशा बातम्या शेअर केल्या जातात, ज्यामध्ये दावा केला जातो की, मोबाइल फोनच्या जास्त वापरामुळे वापरकर्त्याला ब्रेन ट्यूमर होऊ शकतो. यात किती तथ्य आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हे जाणून घेण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी संशोधन केले आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, मोबाईल जेव्हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, तेव्हा त्याबद्दल सोशल मीडियावर विविध गोंधळात टाकणाऱ्या गोष्टी शेअर केल्या जात आहेत, मात्र याच्या उलट अनेक गोष्टी संशोधनातून समोर आल्या आहेत.
उदाहरणार्थ, मोबाईल फोनच्या रोजच्या वापरामुळे ब्रेन ट्यूमर किंवा ब्रेन कॅन्सरचा धोका वाढत नाही. मोबाईल आणि ब्रेन ट्यूमरचा काही संबंध आहे का, किती लोकांवर संशोधन झाले आणि त्यात कोणत्या विशेष गोष्टी समोर आल्या? जाणून घ्या. मोबाईल आणि मेंदूच्या कर्करोगाचा संबंध शोधण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी यूकेमधील ४ लाख लोकांवर संशोधन केले. जवळपास दशकभर त्यांचा मागोवा घेण्यात आला.
संशोधनात समाविष्ट असलेल्या ४ लाख लोकांचे वय 50 ते 80 वयोगटातील होते. हे संशोधन 2001 ते 2011 दरम्यान करण्यात आले. हे लोक तो फोन कधी आणि किती वापरतात, याची माहिती घेण्यात आली. त्यांची उत्तरे आरोग्य नोंदींशी जुळत होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये ब्रेन ट्यूमर तर विकसित झाला नाही ना, याची तपासणी करण्यात आली. जर्नल ऑफ नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या रिपोर्टनुसार, असे अनेक सिद्धांत समोर आले आहेत, ज्यात असा दावा करण्यात आला आहे की, मोबाईल फोनमधून निघणाऱ्या रेडिओ लहरी कवटीच्या आत प्रवेश करतात आणि मेंदूपर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे कर्करोग होतो.